पिंपरी, दि. १५ (महाराष्ट्र मंथन) :- ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या “फ्री पास” प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांची संपूर्ण देशात बदनामी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेत सदर प्रकरणाची सारवासारव करीत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आणि तात्काळ त्यावर कार्यवाही करण्यात आली.
पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलिस नाईक महेश नाळे असे या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाचे पिंपरी येथील एचए मैदानावर प्रयोग सुरू आहेत. पिंपरीमध्ये एका पोलिसाने फ्री पास दिले नाहीत तर महानाटयाचे प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले होते तसेच त्या संबंधित पोलिसांना समज देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे आणि पोलिस उपायुक्त डॉ. विवेक पाटील यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
