पुणे, दि. ११ (युनूस खतीब) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ‘संविधान दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मुख्य संकल्पनेतून आणि समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘संविधान दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे.
वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे. भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
वारकरी बांधव व नागरिकांना संविधानाच्या प्रास्ताविकाचे व बार्टी घडीपत्रिकेचे वाटप करून संविधान दिंडीचे महत्त्व विषद करण्यात येणार आहे. संविधान दिंडीमध्ये बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, प्रकल्प अधिकारी व समतादूत यांचा समावेश असणार आहे.
पालखी सोहळ्यात संविधान दिंडीचा वारकरी बांधव व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्यावतीने करण्यात आले आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0