
पुणे, दि. 27 (महाराष्ट्र मंथन):- मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे त्यामुळे शासनाने या शाळांचे थकित रक्कम त्वरित देवून या गरीब मुलांना शिकण्यापासून वंचित ठेवू नये, असे सांगत आज आम आदमी पार्टीने पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
‘एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात, परदेशात चालू आहे. परंतु सरकार गरीब, वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही असे सांगत हात वर करीत आहे’ अशी टिका आप चे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली.
महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात. आता २२-२३ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शासनाकडून गेल्या चार वर्षातील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी आम आदमी पार्टी मागणी करीत आहे. अन्यथा आम आदमी पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा या वेळेस देण्यात आला.
आजच्या निदर्शनात विजय कुंभार पुणे शहर कार्याध्यक्ष, मुकुंद किर्दत जिल्हाध्यक्ष, चेतन बेंद्रे, डॉ. अभिजित मोरे, एकनाथ ढोले, वैशाली डोंगरे, प्रीति निकाळजे, मिताली वडवराव, माधुरी गायकवाड, श्रद्धा शेट्टी, सीता केंद्रे, शामिम पठाण, रुबीना काजमी, सुरेखा भोसले, किरण कांबळे, अमोल मोरे, अमित म्हस्के, उत्तम वडवराव, मनोज शेट्टी, अविनाश भाकरे, अक्षय धावडीकर, किशोर मजुमदार, शेखर ढगे, स्वप्नील जेवळे, सुजित अग्रवाल, धर्मेंद्र डोंगरे, घनश्याम मारणे, सराफराज मोमीन, सतीश यादव , निलेश वांजळे, सुनील भोसले, संजय कटरनवरे, आर.ए.पडाळे, संतोष लावंड, इमरान खान, जाफर खान, अल्ताफ शेख, आसिफ बागवान आदी सामील झाले होते.
