

पिंपरी, दि. 18 (महाराष्ट्र मंथन):- शैक्षणिक संस्थांजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडक पाऊले उचलत ७२ ठिकाणी शाळेच्या १०० मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली आहे.
शहरातील विविध भागातील ७२ ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसराची पाहणी महापालिका आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने केली. टपरी, चहाविक्रीची ठिकाणे, पत्राशेड, खाजगी जागा, बंदिस्त गाळे, भाजी विक्री केंद्र, आदींची तपासणी यावेळी करण्यात आली. संशयास्पद वाटलेल्या विक्रेत्यांना नोटीस बजावून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. तसेच शाळांच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्यादेखील हटवण्यात आल्या. तरूण पिढीसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावे तसेच ते कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष कायदे तयार केले आहेत. तंबाखूच्या धोक्यापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याकरिता राज्य सरकारने शाळेच्या शंभर मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे.
ब क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चार आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ८ विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ४ विक्रेत्यांच्या टपऱ्या देखील हटवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची कारवाई इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये देखील सुरू आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, “अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथक आणि महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील शैक्षणिक संस्थांच्या परिसराची संयुक्त पाहणी केली. तंबाखूजन्य पदार्थ विक्री होणाऱी ७२ ठिकाणे यात आढळून आली. सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ३२५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
महापालिका आयुक्त शेखर सिंग म्हणाले, शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूजन्य अंमली पदार्थांपासून मुक्त रहावा यासाठी महापालिका आणि पोलीस दल काम करत आहे. तरूण पिढीचे भविष्य उज्ज्वल आणि आरोग्यदायी व्हावे हा यामागचा प्रमुख उद्देश असून त्यांच्या संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी करून शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, नागरिकांनी या मोहीमेत सहभाग घेऊन शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास महापालिकेच्या शिक्षण विभागास तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबतची माहिती द्यावी.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 11
Total views : 59573
Who's Online : 0