पिंपरी, दि. ४ (महाराष्ट्र मंथन):- काळेवाडी येथील खुशी मुल्ला या महिला खेळाडूची १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड ही औद्योगिक तसेच क्रिडानगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब असून त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
खुशी मुल्ला या महिला क्रिकेट खेळाडूची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. या निमित्ताने खुशी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. त्यादरम्यान त्यांचा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
सत्काराच्या वेळी क्रिडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख तसेच खुशी मुल्ला यांचे वडील नवीलाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते संजय गायके आदी उपस्थित होते.
खुशी मुल्ला यांनी १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील, २३ वर्षाखालील गटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शनही लाभले आहे.
माझी कर्णधारपदी निवड झाली, या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत असून पिंपरी चिंचवड शहरातून माझी निवड झाल्याने शहराच्या नावलौकिकात भर पाडण्यात मी निश्चितच जास्तीत जास्त प्रयत्न करेन, असा विश्वासही कर्णधार खुशी मुल्ला यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेने क्रिकेट खेळासाठी प्रशस्त मैदान तसेच सरावादरम्यान पावसाने व्यत्यय येऊ नये यासाठी बंदिस्त इनडोअर हॉल उपलब्ध करून दिल्यामुळे सराव करण्यास सुलभता निर्माण झाली. त्यामुळेच खुशी मुल्ला ही उदयोन्मुख खेळाडू तयार झाली असून अनेक खेळाडूही प्रशिक्षण घेत आहेत, असे सांगून भविष्यात खुशी मुल्ला या भविष्यात क्रिकेटमध्ये फक्त शहराचेच नव्हे तर देशाचेही नाव उंचावणारी कामगिरी करतील असा विश्वास प्रशिक्षक शादब शेख यांनी व्यक्त केला.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 1