NSA आणि MEA च्या अपयशानंतर सिनेस्टार शाहरुख खानच्या मध्यस्थीमुळे कतारने “त्या” ८ नौदल अधिकार्‍यांना मुक्त केले – सुब्रमण्यम स्वामी

दिल्ली, दि. १३ (महाराष्ट्र मंथन):- कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौदल अधिकारी यांना मोठी राजकीय मुत्सद्देगिरी करून भारतात परत आणल्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीने लाटल्यानंतर या प्रकरणाबाबत मोठे खळबळजनक विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. स्वामी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटले आहे की, सोशल मीडिया X वरील पंतप्रधानांच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले होते की पंतप्रधान मोदींनी शाहरुख खानला आपल्यासोबत कतारला घेऊन जावे कारण परराष्ट्र मंत्रालय आणि NSA कतारच्या शेखांना पटवण्यात अपयशी ठरले आहेत. पीएम मोदींनी पुन्हा शाहरुख खानला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. अशा प्रकारे आमच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना मुक्त करण्यासाठी कतारच्या शेखांशी तडजोड झाली.
शाहरुख खान ने याबाबत काय म्हटले?
प्रसारमाध्यमांनी विचारणा केल्यानंतर शाहरुख खान याने सुब्रमण्यम स्वामी यांच्या विधानाला कोणताही दुजोरा दिला नाही आणि याला केवळ एक अफवा म्हटले आहे. आणि शाहरुखलाही इतर भारतीयांप्रमाणेच आपले नौदल अधिकारी सुखरूप पोहोचल्याचा तेवढाच आनंद असल्याचे संगितले.
प्रकरण नेमकं काय?
कतारमध्ये गंभीर आरोपांखाली नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौसैनिक दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सलटन्सी सर्विसेसमध्ये काम करत होते. या कंपनीकडे सैन्य दलांना उपयुक्त असणारी यंत्र पुरवली जातात. शिवाय ही कंपनी सुरक्षा एजन्सींची स्थानिक भागिदार देखील आहे. त्यामुळे सैन्य दलात उपयुक्त असणाऱ्या उपकरणांची या कंपनीकडून देखभाल केली जाते. निवृत्त 8 नौसैनिक तब्बल 4 ते 6 वर्षांपासून कंपनीत काम करत होते. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द झालेल्या नौसैनिकांपैकी कमांडर पूर्णेंदू तिवारी हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. 2019 त्यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. कतारमधील कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, पूर्णेंदू तिवारी भारतीय नौदलात अनेक मोठ्या नौकांचे काम पाहात होते. मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही कतार सरकारनं माजी नौसैनिकांवरील आरोप गुप्त ठेवले होते. सार्वजनिकरित्या त्यांच्यावर असलेले आरोप सांगण्यात आले नव्हते. मात्र, त्यांना सुरक्षेच्या कारणास्तवच अटक करण्यात आली होती. यानंतर मृत्यूदंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारच्या विनंतीवरून, कतारच्या अमीरनं आठ नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा आधीच कमी केली होती आणि त्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं होतं.

Leave a Comment

READ MORE