पिंपरी, दि. २४ (महाराष्ट्र मंथन) :- देशात ते चारशेपार म्हणत असले, तरी भाजप दोनशे देखील पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्र व्देष करणा-यांना मतदान करणार नाही, ही भूमिका आज मतदार घेत आहेत. देशातील अंधकार दूर करण्यासाठी मावळ लोकसभेतून मशाल चिन्हासमोरील बटण दाबून संजोग वाघेरे यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज, मंगळवारी दाखल करण्यात आला. त्यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभेला संबोधित केले. त्यामुळे आदित्य ठाकरे बोलत होते. भाजपचे सरकार परत येणार नाही. अबकी बार, भाजपा तडीपार करण्याची गरज सर्वांच्या लक्षात आलेली आहे.
युवकांचे रोजगार हिरावले. गद्दारांचे सरकार आल्यावर एकही नोकरीची संधी आलेली नाही. गुजरातला विरोध नाही, पण महाराष्ट्र, आसाम, केरळ, मणिपूर सर्वांना हक्काचे जे असेल ते मिळाले पाहिजे. ज्या राज्यात गुंड मंत्रालयात रील काढतात. तिथे कोणाला सुरक्षित वाटत नाही. बलात्कार करणाऱ्या प्रत्येकाला फाशी झाली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आपल्याला आहे. मात्र, भाजपकडून बलात्का-यांना वाचविण्याचे काम केले जाते. महिला वर्ग भाजपला मतदान करणार नाही. महागाईमुळे गरिबांना जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, महिला, युवा, गरिब या वर्गाला देशोधडीला लावण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले. कृषीमंत्र्याचे नाव देखील माहित नाही. पुढचे पाच वर्षे हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या सरकार असताना कर्जमाफी दिली. भाजपने शेतकऱ्यांवर लाठ्या-काठ्या चालविल्या, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
पक्ष फोडला, चिन्ह चोरले, तरी सुज्ञ जनता ठाकरेंबरोबर: माणिकराव ठाकरे
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले, देशात ज्या पद्धतीने राजकारण भाजपने केले. धर्माच्या, जातीच्या नावाने लोकांना फसवले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत पक्ष फोडला, चिन्ह चोरले हे भाजपने घडवून आणले. परंतु जनता सुज्ञ असून ते ठाकरेंबरोबर आहे. तेच निवडणुकीत त्यांना उत्तर देणार आहेत. मशाल चिन्हासमोरील बटण दाबून संजोग वाघेरेंना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
गद्दारी गाडण्यासाठी मावळमध्ये मशाल पेटवा : डॉ. अमोल कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शिवसैनिक निखा-यासारखा असतो. तो पेटून उठला, तर तो विझत नाही. आदिलशाहीला न जुमानता वतनावर पाणी सोडून कान्होजीराजे जैधे स्वराज्यासोबत राहिले. म्हणून त्यांच्या निष्ठेचा इतिहास सांगितला जातो. या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून गद्दारी गाडण्यासाठी मावळ लोकसभेत मशाल पेटवा, असं आवाहन त्यांनी केले
गद्दारांना धडा शिकविण्यासाठी आणि भाजपला जागा दाखविणारी ही लढाई आहे : रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण सर्व एकत्र आहोत. मावळच्या भूमीने कायम स्वाभिमान राखला. तोच या निवडणुकीत राखणार आहेत. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी आणि भाजपला जागा दाखविणारी ही लढाई आहे. एकजुटीने आपलं ठरलंय, संजोग वाघेरे यांना खासदार करायचंय, असा नारा देत संजोग वाघेरेंना शहरातून तीन लाखांचे मताधिक्य द्या, असे आवाहन रोहित पवारांनी केले.
गद्दारी करणाऱ्यांना जनता गाडून टाकणार आहे : संजोग वाघेरे
उमेदवार संजोग वाघेरे पाटील आपल्या भाषणात म्हणाले, विशाल रॅलीच्या निमित्ताने उपस्थित जनसमुदाय पाहून गद्दारी करणाऱ्यांना जनता गाडून टाकणार आहे, हे निश्चित झालेले आहे. आपण सर्व जण मिळून या निवडणुकीत पक्षाला आणि उद्धव साहेबांना यातना देणा-यांचा बदला घेणार आहोत. त्यांना त्यांची जागा दाखवून देवू. जे दहा वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघात झाले नाही, ते काम पुढच्या पाच वर्षांत करून दाखवू. मशाल चिन्ह येत्या १३ मेला मेला इतिहास घडविणार आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 1