मुंबई, दि. २२ (महाराष्ट्र मंथन):- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने असेच अभेद्य राहणे आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव करण्याचे ठरवले आहे. यामुळे आतापासूनच जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. याबाबत एक फॉर्म्युला समोर आला आहे. जागांवरून विनाकारण दावे-प्रतिदावे करण्याऐवजी आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी वाटपात समसमान जागा घेण्याबाबत विचार सुरू आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचा ‘राष्ट्रवादी’ गट अशा तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९६ जागा वाटून घ्यायच्या आणि आपल्या मित्रपक्षांना आपल्यातील जागा द्यायच्या अशा प्रकारचे वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हा तिढा आता लवकरच सुटेल आणि अधिकृत घोषणा होईल, अशीही माहिती आहे.
तसेच मुख्यमंत्रिपदावरून हेवेदावे करण्याऐवजी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, अशा प्रकारचाही ‘फॉर्म्युला’ आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चिला जात असल्याची माहिती आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.
तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने भाजपला तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का बसला. महायुतीला लोकसभेच्या ४८ पैकी केवळ १७ जागाच पदरात पाडून घेता आल्या. यामुळे येणाऱ्या काळात भाजपचे टेंशन वाढले आहे.
ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मुंबईतील जागांवरून शेवटपर्यंत घासाघीस सुरू होती. मात्र, त्याचा त्यांना फारसा फटका बसला नाही. आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जागावाटप लवकर पूर्ण करून प्रचारासाठी कसा जास्तीचा वेळ मिळेल, असेही सांगितले जात आहे.












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0