परळी, दि. ३० (महाराष्ट्र मंथन):- बीडच्या परळीमधील मरळवाडी येथील अजित पवार गटाचे सरपंच बापूराव आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी बीड पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल आल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली. बीडचे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर याबाबत अधिक तपास करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गित्ते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गित्ते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले.
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी निवडणूक लढवली होती. मरळवाडी ग्रामपंचायतमध्ये आंधळे सरपंच झाले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. परळीमधील बँक कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी आंधळेंचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
या घटनेनंतर रात्री उशिरा बीडचे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर रात्रीपासूनच परळीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0