पिंपळे सौदागर, दि. १४ (महाराष्ट्र मंथन):- पिंपळे सौदागरमधील उच्चभ्रू परिसरात रोज लँड सोसायटीच्या एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून आई-वडिलांसोबत फोनवर बोलत बोलता १४ वर्षांच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. या घटनेनंतर त्यास तातडीने पिंपळे सौदागरमधील लोटस हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. मल्हार मकरंद जोशी, असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
मल्हार हा पोदार शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त परळी येथे गेलेले होते. त्यामुळे तो घराजवळच त्याच्या आईच्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेला होता. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्याच्या आई-वडिलांचा फोन त्याला आला. त्यामुळे त्यांच्यासोबत तो फोनवर बोलत होता. फोनवर बोलत असताना त्याने मध्येच फोन कट केला आणि फोन फेकून दिला. त्यानंतर त्याने अचानक पळत जाऊन गॅलरीतून खाली उडी मारली. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मल्हार जोशी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेबाबत मल्हार याच्या आई-वडिलांना माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा उलगडा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
-: पोलिस करणार मुलाच्या पालकांची चौकशी :-
पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिस आता मुलगा ज्या घरी राहिला होता तिथेही चौकशी करणार आहेत. तसेच त्याच्या पालकांची चौकशी होणार आहे. पोलिसांनी मुलाचा मोबाइल ताब्यात घेतला असून त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर संबंधित सोसायटीत एकच चर्चा सुरू होती.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0