दाहोद, दि. २४ (महाराष्ट्र मंथन):- गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील एका शाळा मुख्याध्यापकानं पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीवर कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला व नंतर तिची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.
अवघ्या सहा वर्षांच्या पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीची तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकानं गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील ही घटना आहे. या मुख्याध्यापकानं त्याच्या कारमध्येच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर तिला गप्प करण्यासाठी मुख्याध्यापकानं तिची गळा दाबून हत्या केली. नंतर शाळेच्याच मागच्या बाजूला तिचा मृतदेह फेकून दिल्याचा घटनाक्रम पोलीस तपासात उघड झाला आहे.
- पोलिसांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तामध्ये या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी या चिमुकलीची आई तिला घेऊन निघाली असता शाळेचा मुख्याध्यापक त्याच्या गाडीतून शाळेत जात होता. तेव्हा मुलीला आपण सोडतो, असं म्हणून त्यानं त्या चिमुकलीला कारमध्ये बसवलं. आईनंही विश्वासानं मुलीला मुख्याध्यापकासोबत पाठवलं.
- दरम्यान, मुख्याध्यापकानं वाटेतच कारमध्ये त्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं विरोध करत आरडाओरड करायला सुरुवात केली. ते पाहून तिला गप्प करण्यासाठी नराधम मुख्याध्यापकानं त्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली.
- धक्कादायक बाब म्हणजे या नराधमानं दिवसभर त्या चिमुकलीचा मृतदेह आपल्या गाडीतच ठेवला. शाळेत पोहोचल्यावर दिवसभर त्यानं त्याची नेहमीची कामंही केली. शाळा सुटल्यानंतर त्यानं मुलीच्या चपला आणि दप्तर अनुक्रमे वर्गाच्या बाहेर आणि वर्गामध्ये बाकावर ठेवलं. नंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या मागच्या बाजूला फेकून दिला.
- मुलगी शाळा सुटूनही घरी न आल्यामुळे हवालदील झालेल्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. यासंदर्भात दाहोदचे पोलीस अधीक्षक राजदीपसिंह झाला यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “या प्रकरणाची १० वेगवेगळ्या पोलीस पथकांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर काही बाबी आम्हाला स्पष्ट झाल्या. यानुसार, ती मुलगी शेवटची शाळेच्या मुख्याध्यापकासोबतच दिसली होती हे नक्की होतं. तिच्या आईनं तिला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी मुख्याध्यापकासोबत पाठवलं. पण इतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जबानीनुसार गुरुवारी ती मुलगी शाळेत आलीच नाही”, असं झाला म्हणाले.
- “सुरुवातीला मुख्याध्यापकानं सांगितलं की शाळेत सोडल्यानंतर मुलगी कुठे गेली हे त्याला माहितीच नाही. पण नंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली”, असंही झाला यांनी सांगितलं.
- दरम्यान, या नराधम मुख्याध्यापकानं पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. त्यानं पोलिसांना सांगितलं की शाळेतल्या एका शिक्षकाचा त्याला संध्याकाळी फोन आला होता. मुलगी बेपत्ता झाल्याचं त्यानंच आपल्याला सांगितलं असा दावा मुख्याध्यापकानं केला. पण पोलिसांनी त्याच्या फोनचे दिवसभरातले लोकेशन तपासल्यानंतर खरा प्रकार उघड झाला.
- “शाळा सुटल्यानंतर तो कधी निघाला या वेळेवरून आम्हाला शंका आली की काहीतरी गडबड आहे. आमच्या चौकशीमध्ये त्यानं नंतर कबूल केलं की शाळेत जातानाच कारमध्ये मुलीवर अतिप्रसंग करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. पण मुलीनं विरोध करून आरडाओरड सुरू केल्यामुळे तिला शांत करण्यासाठी त्यानं तिची हत्या केली. त्यानंतर तो शाळेत जाऊन दिवसभराची कामं करत राहिला”, अशी माहिती झाला यांनी दिली.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 59












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0