कोंढवा, पुणे, दि. २ (महाराष्ट्र मंथन) :- “दिवाळी पहाट” कार्यक्रमाचे निमित्त देवून कोंढवा – गंगाधामला जोडणारा कुमार पृथ्वी सोसायटी समोरील रस्ता हा नागरिकांना वेठीस धरून आज रोजी दिनांक २ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आला आहे. मुख्य रस्ता असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच जर सदर परिसरात काही अत्यावश्यक परिस्थिती उद्भवली जसे अँब्युलन्स जाणे, आग लागणे तर त्या गाड्यांना जाण्यास निर्बंध होवून जीवितहानी झाली तर त्यास जबाबदार कोण आयोजक की परवानगी देणारे पोलिस, असा प्रश्नही नागरिक पोलिस प्रशासनास विचारीत आहेत.
तसेच सदर कार्यक्रमास परवानगी देणाऱ्या पोलिस प्रशासनाने येथील परिस्थितीची पाहणी केली नसल्याचेही नागरिकांकडून तक्रार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोंढवा पोलिसांकडून आम्हाला परवानगी मिळालेली आहे.
यावेळी नागरिकांनी अशा प्रकारच्या नियोजनशून्य कार्यक्रमास परवानगी देणाऱ्या पोलिस प्रशासनाबाबतही रोष व्यक्त केला आहे आणि अशा संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.