(शफिक शेख)
बोपोडी, दि. १५ (महाराष्ट्र मंथन):- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथे सन १९९८–१९९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बुधवार, दि. ११ जून २०२५ रोजी उत्साहात व आठवणींनी भरलेल्या वातावरणात संपन्न झाला. तब्बल २६ वर्षांनंतर शालेय मित्र–मैत्रिणी, गुरुजन आणि शिक्षक पुन्हा एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली, त्यानंतर जुन्या आठवणींचा अक्षरशः पाऊस पडला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी, शिक्षणप्रवास आणि आजच्या यशस्वी वाटचालीचा अनुभव शेअर केला. गुरुजनांचा सन्मान करताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.
यावेळी शिक्षक कमलाकर पाटील, रंजना टंकसाळे, वाल्मीक हजारे, सिताराम वाघ, देवेदास सरोदे, जयराम पारधी, गीते सर, कर्णे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेचे शिपाई ते आता पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे आयुक्त सोमनाथ बनकर साहेब, प्रभारी प्राचार्य जीवन कांबळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षकांनी देखील मार्गदर्शनपर विचार व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जुन्या फोटोंचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम व अल्पोपहाराचा आनंद सर्वांनी लुटला.
कार्यक्रमाचे आयोजन १९९८-९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केले होते, आणि उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत, पुन्हा एकदा अशाच भेटीचे वचन देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
