पिंपळे गुरव गावठाणात पारव्यांना अन्नधान्य टाकणाऱ्यांवर आणि संबंधित अधिकार्‍यावर कारवाईची स्थानिकांची मागणी

       सांगवी, दि. २७ (महाराष्ट्र मंथन):- पिंपळे गुरव स्मशानभूमी जवळील महादेव मंदिर परिसरात पारव्यांना खाण्यासाठी धान्य टाकण्यात येत असल्याने पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा धोका वाढून नागरिकांच्या जीवितहानीस कारणीभूत ठरू नये यासाठी हे थांबवण्याची मागणी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. पारवे गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात. पारवा पक्षी फुप्फुसाच्या संसर्गासारखा गंभीर आजार पसरविणारा पक्षी आहे. पारव्यांच्या विष्ठेमार्फत या आजाराचा फैलाव होतो. पारवा व कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे ‘हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया’ हा आजार होत असून, हा फुप्फुसाशी संबंधित आहे. हे जंतू हवेत मिसळून श्वासावाटे आपल्या फुप्फुसामध्ये प्रवेश करतो. यामुळे फुप्फुसाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत चालला आहे.

       पिंपळे गुरव गावठाणात दररोज हजारो पक्ष्यांना धान्य खायला टाकले जाते. त्यामुळे या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात विष्ठा पडते. या माध्यमातून नागरिकांना श्वसनाचा आजार जडू शकतो. त्यामुळे ‘नागरिकांनी पक्ष्यांना उघड्यावर अन्नपदार्थ टाकू नयेत आणि असे करताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल’, असे फलक महापालिकेने विविध ठिकाणी लावले पाहिजेत. मात्र, त्याची जबाबदारी कोणताही विभाग घेत नसल्याची परिस्थिती आहे, असेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

       अन्नधान्य टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात यावा. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे फुप्फुसाशी संबंधित आजार होतात; तरीही पिंपळे गुरवमध्ये कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य टाकले जात आहे. कबुतरे-पारवे नियमितपणे ज्या ठिकाणी आढळतात, त्या ठिकाणांची स्वच्छता महापालिकेने नियमित करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे या नियमाखाली पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड घेण्याची तरतूद आहे. दंड झाल्यास पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांची संख्या आटोक्यात येईल, अशी आशा येथील रविशांनी व्यक्त केली.

Leave a Comment

READ MORE