थेरगाव, दि. 16 (महाराष्ट्र मंथन) :- केवळ घरातील साहित्य संपले आहे हे आधी का नाही सांगितले, या अगदी क्षुल्लक कारणावरून शिवशंभु कॉलनी, थेरगाव, पुणे येथील एका 30 वर्षीय आईने आपल्या पोटच्या मुलीस त्यांचे राहते घरी लाकडी बांबु व लाकडी फळीच्या तुकडयाने मारहाण केल्याने त्यामध्ये तिच्या हाताला, पायाला, पाठीवर व डोक्याला मार लागल्याने तसेच छातीवर हाताने व पायाने मारहाण केली. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी तिला शासकीय रूग्णालय येथे दाखल केले असता उपचारादरम्यान पोलिसांनी तिला मृत घोषित केले.
यावेळी पोलिसांनी आणि रूग्णालयातील डॉक्टरांनी विचारल्यानंतर मृत्यूची चुकीची माहिती लपविल्याबद्दल आणि आपल्या 13 वर्षीय मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाणे, पिं.चिं. चे बालाजी ठाकुर, सहा. पोलीस निरीक्षक यांचे फिर्यादीवरून भा.द.वि.क. ३०२,१८१ सह बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि ठाकुर पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आईला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ठाकुर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन स्विकारण्याचे टाळले. यावरून पोलिसांची प्रसारमाध्यमांप्रती असलेली अनास्था दिसून येते.
