निगडी, दि. २७ (महाराष्ट्र मंथन) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुपीनगर निगडी येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात प्राणिबळी घटना, दिनांक 14 जुलै 23 रोजी घडल्याची बातमी महाराष्ट्र मंथन न्यूज चॅनेलवर प्रसिद्ध झाल्यानंतर त्या बातमीच्या आधारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी निगडी पोलिस ठाण्यात या प्राणीबळी घटनेच्या विरोधात तक्रार दिली. सदर तक्रार निगडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. ताकतोडे साहेब यांनी नोंद करून घेतली आणि यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
सदरील शाळेच्या आवारामध्ये बालवाडी ते दुसरीचे वर्ग सुरू असताना व कायद्याने उघड्यावर पशुहत्या बंदी असताना काही अज्ञात लोकांनी प्राणिबळी दिल्याची घटना घडली आहे.
लहान मुलांपुढे ज्या प्रकारचे वर्तन सतत केले जाते, त्याच पध्दतीचे वर्तन अशी मुलं पुढील काळात करतात. त्यांच्या पुढे हिंसेचं दर्शन वारंवार होत असेल तर हिंसा करण्याची कोणतीही भीती त्यांच्या मनात राहत नाही. ‘धर्माच्या नावाने प्राण्यांचा असा देवळात बळी दिल्यामुळे हे पाहणार्या लहान मुलांच्यावर व त्यांच्या मानसिकतेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो; तसेच मुलांनी जर वांरवार अशा प्रकारची हिंसा पाहिली तर अशा मुलांच्या मनात मानवता, दया, प्रेम अशा भावना जिवंत राहणार नाहीत.
तरी सदर प्रकाराची योग्य ती चौकशी व्हावी व परत असे प्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासनाने संबंधीत लोकांना समज द्यावी आणि शाळेच्या दोन सुरक्षा रक्षकांनी त्यांचे काम नीट केले नसल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी ही विनंती, असे या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची दखल घेत पिंपरी चिंचवड अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वरील आशयाचे निवेदन मा. पोलीस आयुक्त व निगडी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री. ताकतोडे साहेब यांना देण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य विश्वास पेंडसे, रवींद्र बोर्लिकर, सुरेश, सीमा बावनकर आणि विजय सुर्वे उपस्थित होते.