मुंबई, दि. ३ (महाराष्ट्र मंथन):- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना सहज-सुलभपणे मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा रु. १५००/- आर्थिक लाभ देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या ऐवजी १५ वर्षांपूर्वीचे १.रेशन कार्ड २.मतदार ओळखपत्र ३.शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४.जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता सदर योजनेत लाभार्थी महिलांचं वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर, अशा बाबतीत त्यांच्या पतीचा १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
रुपये अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असेही पुढे पवार म्हणाले.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1808164092965716222












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 7
Total views : 59569
Who's Online : 0