निगडी गावठाण येथे प्रवाशांची धोकादायक जाळीतून ये जा
निगडी, दि. २० (महाराष्ट्र मंथन):- निगडी गावठाण परिसरातील कै.मधुकरराव पवळे उड्डाणपुलावर, मारुती मंदिरासमोरील भुयारी मार्गाजवळ एस.टी. महामंडळाच्या बसेस बेदरकार व धोकादायकरीत्या थांबवल्या जातात. त्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी येथून प्रवासी धोकादायक पद्धतीने उतरवले जातात व नजीकच असलेल्या उड्डाणपुलाच्या जाळ्या तोडून प्रवासी जीव धोक्यात घालून ये-जा करतात. ही परिस्थिती भविष्यात गंभीर दुर्घटनेला आमंत्रण देणारी असून कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता असतानाही एस.टी. महामंडळाचे याकडे सपेशल दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असतानाही नाइलाजाने त्यांना जीव मुठीत धरून त्या धोकादायक जाळितून ये जा करावी लागत आहे. त्यामुळे सदर धोकादायक एस.टी. थांबा तात्काळ बंद करून अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा आणि सदर धोकादायक जाळ्यांमुळे कोणत्याही प्रवाशाला जीव गमवावा लागला तर संबंधित एस. टी. महामंडळाच्या अधिकार्यावर सदोष मनुष्यावधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
याच उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी टँकर पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. याच भागात आधीही झालेल्या अपघातांत अनेकांचे जीव गेलेले आहेत तर काही जणांना आयुष्यभराचे अपंगत्व आलेले आहे. पूर्वी सर्व एस.टी. बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी भक्ती-शक्ती चौक येथे थांबत असत. मात्र मेट्रो प्रकल्पाच्या चालू असणाऱ्या कामामुळे आता थेट निगडीतील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाच्या मध्यभागीच एस.टी. बस थांबा निर्माण करण्यात आला. म्हणूनच संबंधित अधिकाऱ्यांनी सदरील ठिकाणी तात्काळ पाहणी करून हा धोकादायक एस.टी. थांबा बंद करून सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.












Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0