पादचाऱ्यांच्या जीवितास धोका;
नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांकडूनच नियमांकडे दुर्लक्ष?
पिंपरी, दि. ७ (शफिक शेख) :- पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि मोकळा असलेला पदपथ हा नागरिकांचा मूलभूत सार्वजनिक वापराचा मार्ग आहे. मात्र, संत तुकारामनगर परिसरातील संत तुकारामनगर पोलिस ठाण्याकडून परिसरात बेवारस व कायदेशीर कारवाईची वाहने पदपथावर आणि रस्त्यावरील काही भागात ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथ सोडून थेट रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असून, अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पदपथावर उभी असलेली वाहने, अपुरा प्रकाश आणि वाहनांची वर्दळ यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या परिसरातच सार्वजनिक पदपथाचा वापर वाहनांच्या साठवणुकीसाठी होत असेल, तर हा प्रकार गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १२२ नुसार वाहन अशा स्थितीत सार्वजनिक ठिकाणी सोडणे किंवा उभे ठेवणे मनाई आहे की ज्यामुळे इतर सार्वजनिक वापरकर्त्यांना धोका, अडथळा किंवा अनावश्यक गैरसोय होऊ शकते. तसेच कलम १२७ सार्वजनिक ठिकाणी बेवारस किंवा unattended स्वरूपात सोडलेल्या मोटार वाहनांच्या हटविण्याबाबत तरतूद करते.
पदपथ हा सार्वजनिक रस्त्याच्या व्यवस्थेचा भाग असल्याने, संबंधित ठिकाणी वाहने ठेवण्यास कोणती कायदेशीर परवानगी आहे, ती वाहने पोलिस तपासणी/जप्तीतील आहेत का, तसेच ती वाहने पदपथावर ठेवण्याची अधिकृत व्यवस्था आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी विचारणा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हे, अपघात किंवा तपासाच्या अनुषंगाने जप्त केलेली वाहने असू शकतात. मात्र, जप्त वाहनांचा सुरक्षित आणि कायदेशीर पद्धतीने साठा करणे ही बाब वेगळी; तर सार्वजनिक पदपथ पादचाऱ्यांसाठी बंद होईल अशा पद्धतीने वाहने ठेवणे ही बाब वेगळी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जर संबंधित वाहने पोलिस तपासातील असतील, तर त्यांच्यासाठी अधिकृत जागा निश्चित करून पदपथ मोकळा ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखादा अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित होत आहे.
संत तुकाराम पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त पाहणी करून पदपथ तातडीने मोकळा करावा, बेवारस वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“पोलिस ठाण्याच्या आवारात वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे काही वाहने रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आली आहेत. ही वाहने पोलिस ठाण्याशी संबंधित असून जागेअभावी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.”
— सुहास आव्हाड
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
संत तुकाराम नगर पोलिस ठाणे









