
शफीक शेख
रुपीनगर, दि. २६ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर आणि सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय विजेतेपद पटकावले आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली!
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय व सौ. अनुसया वाढोकर उच्च माध्यमिक विद्यालय, रूपीनगरच्या क्रीडा प्रवासात प्रथमच १४ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही कामगिरी संपूर्ण विद्यालयासाठी, संस्थेसाठी आणि सर्व क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या ऐतिहासिक यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा आणि नवी प्रेरणा मिळाली आहे.
सेमीफायनलच्या सामन्यात अहिल्यानगर शहराच्या संघाचा ३८–१८ अशा गुणफरकाने पराभव केल्यानंतर अंतिम सामन्यात पुणे शहराच्या संघाला ४५–१६ अशा मोठ्या गुणफरकाने पराभूत करून विभागीय विजेतेपदावर ज्ञानदीपच्या संघाने आपले नाव कोरले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे, त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक व क्रीडा शिक्षकांचे, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देणारे दोन्ही विद्यालयांचे मुख्याध्यापक यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
खेळाडूंची अथक मेहनत, प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन आणि विद्यालयाने दिलेले सहकार्य यांचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.
विभागीय स्तरावर मिळविलेल्या या ऐतिहासिक यशाची परंपरा राज्यस्तरावरही कायम राखून विद्यालयाचा नावलौकिक अधिक उंचावावा अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.
Author: Maharashtra Manthan
Views: 51









