१५ पोलिसांवर मोठी कारवाई, ३ जण गजाआड
सरायकेला (झारखंड) (वृत्तसंस्था): घरात होणाऱ्या त्रासाची दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या एका २० वर्षीय विवाहितेवर पोलीस ठाण्यातच लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. झारखंडमधील सरायकेला-खरसावां जिल्ह्यातील गम्हरिया पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक (SP) मनोज स्वर्गियारी यांनी एकूण १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली असून, तिघांना अटक करून तुरुंगात धाडले आहे, तर ९ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी २९ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा आपल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवण्यासाठी गम्हरिया पोलीस ठाण्यात गेली होती. रात्रीची वेळ झाल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यातीलच एका खोलीत थांबण्यास सांगितले.
रात्रीच्या वेळी वायरलेस ऑपरेटर तथा पोलीस शिपाई नीरज लकडा याने त्या खोलीत जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी पीडितेने एका छोट्या चाकूने नीरजवर वार केले. त्यामुळे घाबरून आरोपी तेथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत पीडितेला पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
३ जण अटकेत, विशेष तपास पथक (SIT) गठीत
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गियारी यांच्या आदेशानुसार सरायकेला एसडीपीओंच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले.
मुख्य आरोपीसह तिघांना अटक: पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपी कॉन्स्टेबल नीरज लकडा याला अटक केली. तपासात मदत व प्रकरण दाबण्यात सहभाग आढळल्याने सब-इन्स्पेक्टर मनोज कुमार साहू आणि कॉन्स्टेबल संतोष कुमार राय या दोघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ९ पोलीस निलंबित
एसडीपीओंच्या तपास अहवालानंतर कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा व सुरक्षेत कुचराई केल्याप्रकरणी रविवारी आणखी ९ पोलिसांना निलंबित करण्यात आले. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे:
२ सब-इन्स्पेक्टर (PSI)
४ सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI)
२ हवालदार१ पोलीस कॉन्स्टेबल
पोलीस ठाण्यातच घडलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर शिक्षेची मागणी होत आहे.









