
पिंपरी, दि. 7 (शफिक शेख) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामानवांविरोधात पुण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खोडसाळपणे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित केले आहे. या प्रकारामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली असून जयंतीदिनाच्या कार्यक्रमास कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता जयंतीदिनाच्या कार्यक्रमाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणारे उद्घाटन रद्द करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन पत्राद्वारे मागणी केली आहे. या संघटनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन महासंघ, युवा कामगार सेना, बहुजन समाज पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा समावेश आहे. या सर्व संघटनांनी निवेदन पत्राद्वारे मा. पोलीस आयुक्तांना चंद्रकांत पाटील यांना मज्जाव करण्याची विनंती केली आहे. अन्यथा या सर्व संघटना जयंतीदिनी सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने या कार्यक्रमाचा निषेध करतील असेही कळविण्यात आले आहे.










