किवळे, दि. 18 (महाराष्ट्र मंथन) :- काल रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंगळुरू-मुंबई हायवे, किवळे ओव्हरब्रीजजवळ, सर्व्हिस रोडलगत, शार्वी हॉटेलचे जवळ येथे सायंकाळी 5.30 च्या सुमारास वादळी वा-यामुळे जाहिरातीचा होर्डिंग येथील पंक्चरच्या दुकानावर कोसळून दुकानात निवा-यासाठी थांबलेल्या लोकांच्या अंगावर कोसळून झालेल्या अपघतात 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यामध्ये 4 महिला आणि 1 पुरूषाचा समावेश आहे.
याबाबतीत वर्दळीच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची खबरदारी न घेता आणि अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणा रावेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र सोपान पन्हाळे यांनी फिर्याद दिली असून भारतीय दंड विधान कलम 304 (2), 34 नुसार नामदेव बारकु म्हसुडगे (जागा मालक), दत्ता गुलाब तरस (होर्डिंग बनविणारा), महेश तानाजी गाडे (होर्डिंग भाडयाने घेणारा) आणि जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधित यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे हे पुढील तपास करीत आहेत.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे –
- शोभा विलास टाक वय 50 वर्षे रा. पारशी चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, पुणे,
- वर्षा विलास केदारी वय 50 वर्षे रा. गांधीनगर देहूरोड, पुणे,
- रामअवध प्रल्हाद आत्मज वय 29 वर्षे रा. पिंपारा सोहत, लक्ष्मीपूर, रेजमहाराज गंज उत्तरप्रदेश,
- भारती नितीन मंचक वय 33 वर्षे, रा. शितळादेवी मंदिराजवळ, मामुर्डी, पुणे
- अनिता उमेश रॉय वय 45 वर्षे रा. थॉमस कॉलनी देहूरोड, पुणे
- तसेच यामध्ये तीन जखमींचाही समावेश आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे –
- विशाल शिवशंकर यादव, वय 20 वर्षे रा. उत्तरप्रदेश (पंक्चर दुकानवाला)
- रहमद मोहम्मद अन्सारी वय 21 वर्षे रा. शार्वी हॉटेलजवळ किवळे पुणे (पंक्चर दुकानवाला)
- रिंकी दिलीप रॉय वय. 45 वर्षे रा. थॉमस कॉलनी देहूरोड, पुणे
या अपघातानंतर परिसरामध्ये दुःखाचे वातावरण असून नागरिकांमध्ये दुःख आणि संताप दोन्ही दिसून आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये असलेल्या अनेक अनधिकृत होर्डिंग्जवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लवकरात लवकर कारवाई करून ते काढून टाकावे, अशी मागणी नागरिकांमधून संतापाने केली जात आहे.










