निगडी, दि. (महाराष्ट्र मंथन) :- गोवा येथील एका २९ वर्षीय महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस ठाण्याच्या ओटास्किम चौकीत निगडी पोलीस स्टेशन अंकित ओटास्किम पोलीस चौकीत सोमवार दि. १७/४/२०२३ दुपारी चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतीत निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उंडे यांनी सांगितले की या प्रकरणाचा पुढील तपास हा केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी गोवा येथे तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी गोवा येथे एका २९ वर्षीय महिलेशी अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. दरम्यान, अल्पवयीन मुलगी निगडी येथे परत आली. त्यानंतर गोवा येथील ती महिला निगडी येथे येऊन अल्पवयीन मुलीला घेऊन गेली. मात्र याबाबत अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी केली. निगडी पोलिस ठाण्यात १२ एप्रिल २०२३ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एक अल्पवयीन मुलगी एका महिलेसोबत असून त्यांचा वावर संशयास्पद आहे, अशी माहिती अहमदनगर येथील चाईल्ड हेल्पलाइनला मिळाली. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी मुलीकडे चौकशी करून तिच्या वडिलांशी संपर्क केला असता मुलीचे वडील आणि निगडी पोलिस अहमदनगर येथे पोहचून अल्पवयीन मुलीला व महिलेला ताब्यात घेऊन निगडी पोलिस ठाण्यात आले.
अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवडिलांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी ओटास्किम पोलिस चौकीत नेण्यात आले. जबाब नोंदणीचे कामकाज सुरू असताना २९ वर्षीय महिला चौकीतील स्वच्छतागृहात गेली मात्र, स्वच्छतागृहातून लवकर बाहेर न आल्याने पोलिसांनी तिला बराच वेळ आवाज दिला पण तिचा प्रतिसाद न आल्याने स्वच्छता गृहाचा दरवाजा तोडला. महिलेने स्वच्छतागृहातील लोखंडी अॅंगलला स्वेटरच्या साह्याने गळफास घेवून संशयास्पदरित्या आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.










