उत्कृष्ठ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निकृष्ठ दर्जाचे काम

त्रिवेणीनगर, दि. 3 (अ. मुकरताल) :- उत्कृष्ठ कार्यप्रणाली असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विभागाने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम करून त्रिवेणीनगर चौकी येथे काही कालावधीपूर्वीच उभारलेले कमी दर्जाचे वाहतूक सिग्नल हे काल रात्री सुमारे 12.30 च्या सुमारास उखडून रस्त्यावर पडले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने आणि नागरिकांची ये-जा नसल्याने त्यामध्ये कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु हेच सुदैव दरवेळेस असणार आहे का? किंवा नागरिकांनी अशाचप्रकारच्या सुदैवाच्या आशेवर जीव मुठीत धरून ये-जा करायची का? वाहनचालक जे या रस्त्यावरून वाहने चालवितात त्यांच्या जीवाची हमी कोण घेणार? या सिग्नलचे कॉन्ट्रॅक्टरवर किंवा संबंधित विभागावर कारवाई होईल का? असे अनेक प्रश्न या परिसरातील नागरिक करीत आहेत.
हा मुख्य रस्ता असून चार मार्ग या चौकाला जोडलेले आहेत. भरपूर वर्दळ शाळा, कंपन्या, चर्च, अशी खूप वर्दळ असलेल्या चौकामधील सिग्नलचे बांधकाम करताना अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणारे निकृष्ठ दर्जाचे काम करून नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचविण्याचा अधिकार संबंधितांना कोणी दिला? या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, या सर्व प्रकारची तपासणी करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांनी त्वरित द्यावे, अन्यथा याच चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे येथील सर्वसामान्य नागरिकांनी सांगितले आहे.

Leave a Comment

READ MORE