सांगली (बेडग), दि. 21 (महाराष्ट्र मंथन):- मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडल्यानंतर गावात जातीयवाद होत असल्याचा आरोप करत दलित समाजाने गाव सोडून पायी मंत्रालयाकडे रवाना झाला आहे. अन्य गावात पुनर्वसन करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बेडग हे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातले गाव आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे दलित समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र १६ जून रोजी कमान बेकादेशीर असल्याचं ठरवत, ग्रामपंचायतने बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला होता. बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. त्यानंतर कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकर प्रेमीकडून आंदोलन करण्यात आले होते.
“ज्या गावात डॉ. आंबेडकरांच्या नावाला विरोध होतो त्या गावातून बाहेर पडायचा निर्धार समस्त दलित समाजाकडून घेण्यात आला आहे”. बेडग गावामध्ये सुमारे १५० हून अधिक घरे आहेत. सर्वांनी गाव सोडून जाण्याची भूमिका घेतली आहे.
मंगळवारी गावातील दलित समाज गाव सोडून थेट मंत्रालयाकडे आपला संसार साहित्य, गुरढोरं आणि मुलाबाळांसह रवाना झाला आहे. मंत्रालयाकडे पायी जाऊन आंदोलन करत जातीवाद नसणाऱ्या गावात पुनर्वसन करण्याची मागणी करणार आहेत. तर गाव सोडत असल्याबाबतचं पत्र देखील बेडग ग्रामस्थांच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जातीयवादी पुढा-यांच्या त्रासाला कंटाळून परवा गावच सोडले. घरांना कुलुपे लावून बेडग येथुन लाँग मार्च सुरू केला आहे. सर्व अस्वस्थ करणारं चित्र आहे. घरादाराला कुलुप लावुन हा समाज मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच असे अस्वस्थ करणारं चित्र निर्माण झाले आहे. सर्व कायदेशीर बाजु या समाजाच्या बाजुने आहे. मात्र सांगली जिल्हा भाजपचे खासदार संजय पाटील, सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या दबावाखाली सांगली जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा गावच्या मुठभर जातीयवादी मानसिकतेच्या पुढारयांच्या सांगण्यावरुन काम करत आहे.
या आंदोलकांचे नेते सचिन कांबळे व डॉ. महेशकुमार कांबळे यांना शिव – शाहू – फुले – आंबेडकर विचारधारेच्या संघटना आणि कार्यकर्ते फोन वरून व प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देत आहेत.












Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 74
Users This Year : 474
Total Users : 42242
Views Today : 2
Total views : 58522
Who's Online : 0