चिंचवड, दि. ५ (महाराष्ट्र मंथन):- निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखी तपासणीकरीता उपलब्ध करून न दिल्याबाबत मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील ६ उमेदवारांना तर निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीकरीता सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीबाबत ३ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावली आहे.
शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांनी निवडणुकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरीता उपलब्ध करून दिले नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत उमेदवाराने खुलासा सादर न केल्यास भा. दं. वि. कलम १७१ (१) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी, असेदेखील नोटीशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीकरीता सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीबाबत संजोग भिकू वाघेरे पाटील, श्रीरंग आप्पा चंदू बारणे आणि माधवीताई नरेश जोशी या तीन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस दिली आहे.
या नोटीशीमध्ये नमूद केले आहे की, दिनांक ०३ रोजी आपले प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उमेदवाराचा खर्च निवडणूक खर्च आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही, अथवा खर्चाचा काही भाग समाविष्ठ करण्यात आलेला नाही असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली गेली आहे.










