अकोला, दि. ३१ (महाराष्ट्र मंथन):- राज ठाकरे यांचा ‘सुपारीबहाद्दर’ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उल्लेख केल्याने संतापलेल्या मनसैनिकांनी मिटकारी यांची गाडी फोडून आपला संताप व्यक्त केला. त्यापैकीच एक असणार्या जय मालोकार (२४) या मनसैनिकाचा मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. परंतु हा मृत्यू आमदार अमोल मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन करून दबाव आणल्याने झाल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी पंकज साबळे यांनी केला आहे.
अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका त्यांनी केली होती. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या ‘सुपारीबहाद्दरां’नी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची आज अकोल्यात तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला.
आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात मनसैनिक जय मालोकार यांचा सहभाग होता. वाहन तोडफोड आंदोलन प्रकरणात पोलिसांनी पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये जय मालोकार यांचा देखील सहभाग होता. आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मनसैनिक जय मालोकार प्रचंड तणावात आले. या दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका मंगळवारी रात्री आला. उपचारादरम्यान मनसैनिक जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिली. जय मालोकार यांचे होमिओपॅथीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण सुरू होते. मनसेचे आंदोलन व त्यानंतर पोलीस कारवाईचा दबाव आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप होत आहे. मनसैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूला आमदार अमोल मिटकरी जबाबदार असल्याचा आरोप पंकज साबळे यांनी केला आहे. जय मालोकार यांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून शहरात शोककळा पसरली आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 8
Total views : 59570
Who's Online : 0