विद्यानगर, दि. १६ (महाराष्ट्र मंथन):- सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूकीचे नियम पालन करण्यासाठी अतिशय कटिबद्ध आणि कठोर असणारे वाहतूक पोलिस विभाग यांच्या तीक्ष्ण नजरेतून पोलिस विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी कसे सुटतात, याचेच नवल वाटते. नियमपालनामध्ये पोलिसांना “व्हीआयपी” सुविधा आहे काय, असे प्रश्न नागरिक विचारीत आहेत. चिंचवडमधील विद्यानगर येथे एक काळी बुलेट जिच्या मागील बाजूस क्रमांक एमएच १४ एफएन २८३७ असे लिहिले होते. त्यावरील दोन इसम हे वर्दीत नसून सिविल ड्रेसवर होते आणि ते संशयितांना पकडून विचारणा करण्याचे आणि त्यांची कागदपत्रे तपासण्याचे त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी दिलेले कर्तव्य पार पाडीत होते परंतु हे करीत असताना त्यांच्या बुलेटच्या समोरील बाजूस वाहतूक नियमाप्रमाणे वाहन क्रमांक अपेक्षित होते परंतु त्यावर नियमाप्रमाणे वाहन क्रमांकाऐवजी नियम मोडून “खलनिग्रहणाय” असे लिहिले होते.
आता या सर्व प्रकरणावरून हा प्रश्न पडतो की कायद्याने किंवा वाहतूक पोलिस विभागाने पोलिस खात्यातील कर्मचारी किंवा अधिकारी यांना वाहतूक नियमामधून “सूट” दिली आहे का? जर हो तर वाहतूक पोलिस विभागाने तसे जाहीर करावे आणि जर नाही तर मग नियम आणि शिक्षा ही केवळ सामान्य नागरिकांसाठी आहे का? त्यांना दिलेल्या ताकदीचा त्यांनी दुरुपयोग केला आहे आणि नियम माहित असूनसुद्धा जाणून बुजून नियमांचे उल्लंघन केले आहे अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आळा घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे, अशी चर्चा जनतेदरम्यान चालू आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलिस विभागाचे अधिष्ठाता पोलिस आयुक्त साहेब यांनी याबद्दल माहिती द्यावी अशीही मागणी नागरिक करीत आहेत.










