(शफिक शेख)
पिंपरी, दि. ९ (महाराष्ट्र मंथन):- पीसीएमसीचे शहर अभियंता मकरंद निकम यांची ॲड. असीम सरोदे यांनी त्यांच्या सहकारी वकिलांसह पीसीएमसी कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी आम्ही सुनावणी घेतल्याशिवाय, सगळ्यांचे मत ऐकून घेतल्याशिवाय मशिदींच्या विरोधात डिमॉलिशन कारवाई करणार नाही, असे पीसीएमसीचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी आपल्याला सांगितल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
यावेळी ॲड. श्रीया आवले, ॲड. गौतम कुडूक, ॲड. अरहंत धोत्रे, ॲड. प्रशाली काळे, ॲड. राधनी हंबरडे, अस्मा क्षीरसागर उपस्थित होते.
महानगरपालिका कायद्याच्या कलम 487 नुसार पीसीएमसीला नोटीस देणे आवश्यक असल्याने ती प्रक्रिया शहर अभियंता मकरंद निकम यांना नोटीस इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष देऊन पूर्ण करण्यात आल्याची माहिती ॲड. श्रीया आवले यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर मशिदी पाडण्यावर साधारणतः 25 ते 30 दिवसांचा स्टे मिळाला आहे, असे स्पष्ट झाल्याचे ॲड. सरोदे म्हणाले.
आता सगळ्या मंदिर-मस्जिद अशा धार्मिक स्थळांची पाहणी करणे, त्याबाबत अहवाल तयार करणे, सगळ्यांना सुनावणीसाठी वेळ देणे, त्यानंतर पुढील 15 दिवस न्यायालयात जाण्यासाठी वेळ देणे, अशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेच शहर अभियंता मकरंद निकम यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेले आहे.










