(शफिक शेख)
पिंपरी, दि. ३० (महाराष्ट्र मंथन):- बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. कुर्बानीसाठी नेहरू नगर डॉक पॉइंट येथील जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यावेळी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेने तयार केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील कुर्बानीच्या ठिकाणी पुरेशा पाण्याचा पुरवठा, पुरेसे मनुष्यबळ नेमणूक तसेच वेस्ट उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा, स्वच्छता या सर्व बाबीचे व्यवस्थिपणे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबधित विभागांना दिले. तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
बकरी ईदसाठी महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपातील पत्राशेड आणि मंडप उभारण्यात येणार आहे. कुर्बानीच्या ठिकाणी आवश्यक साहित्य, मोबाईल टॉयलेट व्हॅन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी आणण्यात आलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी पुरेशा जागेची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बकरी ईदसाठी आवश्यक पाणी पुरवठ्यासाठी टँकर आणि स्वतंत्र हौद असतील. कुर्बानीनंतर निर्माण होणारे वेस्ट तात्काळ उचलण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक पोलीस यंत्रणा देखील याठिकाणी असणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
यावेळी अति. आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता देवण्णा गट्टूवार, अजय सूर्यवंशी, नितीन देशमुख, उपआयुक्त संदिप खोत, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल, प्रेरणा सीनकर, सुनीलदत्त नरोटे, बी.पी. लांडे आदी उपस्थित होते. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलग, गणेश जामदार यांच्यासोबत विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी चर्चा केली.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0