निगडी, दि. १७ (महाराष्ट्र मंथन):- निगड़ी एकता चौक येथे विसर्जनाचा रथ बसविण्यासाठी एकता मित्र मंडळ या मंडळाने मुख्य रस्त्यावर भलामोठा खड्डा खणला. सदर प्रकरणास आज अनेक दिवस उलटूनही तो खड्डा दुरुस्त करण्यात आला नाही. त्या खड्ड्यात केवळ खडी भरण्यात आली असल्याने त्या खडीवरून घसरून अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. अनेक महिला दुचाकीवरून जाताना सदर खड्ड्यातील खडीमुळे घसरून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याच खड्ड्याच्या पुढे मातृत्व रुग्णालय असल्यामुळे अनेक रुग्ण आणि गरोदर महिला यांनाही शारीरिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, शाळकरी मुले, दवाखान्यातील रुग्ण, वाहनचालक यांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे, तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तो खड्डा दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे.











