पुरंदर, दि. १८ (महाराष्ट्र मंथन) :- कुंपणच खातंय शेत! या म्हणीचा अनुभव पुरंदर तालुक्यातील नीरा पोलीस दूर क्षेत्राच्या हद्दीत आला. ज्या पोलिसांना नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी (कुंपण) म्हणून नेमण्यात आले होते त्याच पोलीस कर्मचाऱ्यानं दुचाकी वाहनं चोरण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विनोद मारुती नामदार असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून बारामती परिसरातल्या वाणेवाडी इथं तो राहत असून तो पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या मुख्यालयात नेमणुकीला आहे. दुचाकी चोरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तर या चोरीच्या दुचाकी खरेदी केल्याप्रकरणी अस्लम मुलानी (रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि पृथ्वीराज ठोंबरे (रा. मुरूम ता. बारामती) या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. वाहन चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस कर्मचारी नामदार याची कसून चौकशी करण्यात आली असता आठ दुचाकी वाहनं चोरली असल्याचं त्यानं कबूल केलंय. विशेष म्हणजे गावी गेल्यानंतर तो दुचाकी वाहनांची चोरी करत होता. पोलीस कर्मचारी नामदार याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी दिली.










