आकुर्डी, दि. २२ (महाराष्ट्र मंथन):- आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेश बालदी, बाळासाहेब पाटील, अमित गोरखे, चंद्रकांता सोनकांबळे, शंकर जगताप, सदाशिव खाडे, बापूसाहेब भेगडे, अजित गव्हाणे, गणेश खांडगे, बाळासाहेब वाल्हेकर, निलेश तरस तसेच नाना काटे राजू दुर्गे, भीमा बोबडे, नामदेव ढाके, भाऊ गुंड, रवींद्र भेगडे, राजू खांडभोर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांचा दणदणाट, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही विजयरथावर बारणे यांच्या समवेत आरूढ झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री शिंदे व अजितदादा यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत अभिवादन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. मिरवणुकीच्या रस्त्यावर दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पीएमआरडीए कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना बारणे यांनी धन्यवाद दिले.
मताधिक्याचा नवा विक्रम करणार – बारणे
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार बारणे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या निवडणुकीत आपण २०१९ मधील आपलाच मताधिक्याचा विक्रम मोडून निवडून येऊ, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आपण विजयी होऊ, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
परिवाराकडून सदिच्छा
उमेदवारी अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी थेरगाव येथील निवासस्थानी खासदार बारणे यांना पत्नी सरिता, बहिण रुक्मिणी कस्पटे, अश्विनी जाधव, सुना स्नेहा प्रताप बारणे, नीता महेश बारणे, कावेरी नीलेश बारणे यांनी औक्षण करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी खासदार बारणे यांचे पुत्र प्रताप व विश्वजीत तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.










